श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हय़ातील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मुदासिर पंडित याचा समावेश आहे. मुदासिर याचा तीन काश्मिरी पोलीस, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याने तो सुरक्षा यंत्रणांच्या हिटलिस्टवर होता. काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये मुदासिरचा सहभाग असल्याचे आयजी विजय कुमार यांनी कारवाईसंबंधी माहिती देताना स्पष्ट केले.
29 मार्च रोजी सोपोरमध्ये रियाझ अहमद पीर आणि शम्स उददिन पीर या दोन नगरसेवकांना गोळय़ा घालण्यात आल्या होत्या. या हत्यांमध्ये मुदासिरचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड झाले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सैन्य दलाचे काम सर्वतोपरी सुरू आहे. दहशतवादी संघटनांचे कारनामे मोडून काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात आहेत. त्यानुसारच सोमवारी सोपोरमध्ये व्यापक मोहीम आखून कमांडरसह तिघांचा खात्मा करण्यात आला.