वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिह्यातील सुगन झैनापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये बुधवारी पहाटे पुन्हा जोरदार चकमक झाली. मंगळवारपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. ठार झालेल्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा खतरनाक कमांडर रियाझ नायकू याच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर दहशतवाद्यांनी मंगळवारीच एका भाजप नेत्यावर हल्ला केला होता. यादरम्यान, एका जवानाला प्राण गमवावे लागले होते.
शोपियानमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी तेथील दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. जवानांकडून अन्य परिसरातही देखील शोधमोहीम राबवली जात आहे. मागील आठवडय़ातच दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले होते. जखमी जवानांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.