श्रीनगर
दहशवादविरोधी मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचा संघर्ष सोमवारीही सुरूच होता. चेरदारी चकमकप्रकरणी सुरक्षा दलांनी सोमवारच्या कारवाईदरम्यान तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक ग्रेनेड आणि 24 गोळय़ा जप्त करण्यात आल्याची माहिती बारामुल्ला पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱया मोहम्मद इब्राहिम नामक कामगारावर सोमवारी गोळय़ा झाडण्याची घटनाही घडली. गोळीबारात इब्राहिम जखमी झाला असून त्याला एसएचएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इब्राहिम हा डॉ. संदिप मावा यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. डॉ. संदिप मावा हे काश्मिरी पंडित आहेत. गेल्या 24 तासात दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी रविवारी बटामालू भागात दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केला होता.