वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या हैदरपोरा भागात सोमवारी रात्री सुरक्षा दलांनी एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. समीर आणि आमीर अशी मारले गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. तर चकमकीत अल्ताफ यालाही सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. अल्ताफ हा एक सिमेंट व्यावसायिक होता आणि त्याने दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
हैदरपोरा येथील एका घरात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना सोमवारी रात्री 7 वाजता मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सैन्यासोबत मिळून तेथे शोधमोहीम सुरू केली. मोहिमेदरम्यान हैदरपोरा भागात दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला होता.
सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्याने सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या मोहिमेत दोन दहशतवादी मारले गेले. तसेच त्यांना मदत पुरविणाराही ठार झाला.
चकमक स्थळावरून 3 मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. त्रालचा रहिवासी समीर तांत्रे, बनिहालचा आमिर तसेच अल्ताफ यांचे हे मृतदेह आहेत. अल्ताफने दहशतवाद्यांना स्वतःच्या घरात आश्रय दिला होता. चकमकीदरम्यान अल्ताफ जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.