अवंतिपोरामध्ये स्पेशल पोलीस ऑफिसरच्या घरावर हल्ला
वृत्तसंस्था/ पुलवामा
काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) आणि त्याच्या पत्नीची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. अवंतिपोराच्या हरिपरिगाम गावातील एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 41 वर्षीय अहमद, त्यांची पत्नी मृत्युमुखी पडली आहे. तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर परिसराला घेरून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री सुमारे 11 वाजता दहशतवाद्यांनी अहमद यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला होता. त्यांनी फैयाज आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार केला. यात फैयाज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीने अनंतनाग येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. तर मुलगी राफियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीआयडी निरीक्षकाची हत्या
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी मागील आठवडय़ात मंगळवारी सीआयडी इन्स्पेक्टर (निरीक्षक)ची हत्या केली होती. नौगाममधील कनिपोरा येथे दहशतवाद्यांनी इन्स्पेक्टर परवेज अहमद डार यांच्यावर तीन गोळय़ा झाडल्या होत्या.
सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला
श्रीनगरच्या बर्बर शाह भागात शनिवारी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त गस्तपथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. यात महिलेसह चार नागरिक जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता.
एलईटीचा टॉप कमांडर जेरबंद, काश्मीरमध्ये मोठे यश
श्रीनगर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरारला अटक केली आहे. नदीम हा खोऱयातील राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येसह अनेक गंभीर गुन्हय़ांकरता वाँटेड होता. दीर्घकाळापासून सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. अटकेनंतर नदीमची मिलिट्री इंटेलिजेन्स आणि पोलीस अधिकारी कसून चौकशी करत आहेत.
श्रीनगरच्या उपनगरांमध्ये नदीम लपून बसल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत होती. नदीमला श्रीनगरच्या परिमपोरा भागात एका कारमधून ताब्यात घेण्यात आले आहे. नदीमसह त्याच्या सहकाऱयालाही अटक करण्यात आली आहे.