शिक्षकांच्या हत्येप्रकरणी 700 हून अधिक जण ताब्यात
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये शीख अन् हिंदूधर्मीय तसेच सर्वसामान्यांवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी 700 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. मागील एक आठवडय़ात काश्मीर खोऱयात काश्मिरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या लोकांसोबत स्थानिक नागरिकांनाही लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी 7 जणांची हत्या केली होती.
ताब्यात घेण्यात आलेल्या 500 जणांचे प्रतिबंधित धार्मिक आणि दहशतवादी गटांशी संबंध आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मारेकऱयांना शोधून काढण्यास आकाश-पाताळ एक करू असे एका पोलीस अधिकाऱयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी ईदगाह भागात एका शाळेत शिरून दोन शिक्षकांची हत्या केली होती. यात मुख्याध्यापिका सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चांद सामील होते. सुपिंदर शीख समुदायाशी तर दीपक चांद काश्मिरी पंडित होते. दहशतवाद्यांनी ओळखपत्र तपासल्यावर त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. तत्पूर्वी श्रीनगरच्या इक्बाल पार्क क्षेत्रात प्रसिद्ध औषधविक्रेते माखनलाल बिंद्रू यांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला होता. 90 च्या दशकातही काश्मीर न सोडणाऱया निवडक लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. तर अवंतिपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारचा पाणीपुरी विक्रेता वीरेंद्र पासवान याची हत्या केली होती.
एनआयएकडून 16 ठिकाणी छापे
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘व्हॉइस ऑफ हिंद’ नियतकालिकाचे प्रकाशन आणि आयईडी हस्तगत झाल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने रविवारी श्रीनगर, अनंतनाग, कुलगाम आणि बारामुल्लामध्येच 9 ठिकाणी छाप्यांची कारवाई केली आहे. तसेच हासन रोड कन्स्ट्रक्शन कंपनीतील चालक नईम अहमद भट आणि मुश्ताक अहमद डारच्या घरीही छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान संशयितांकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2020 पासून व्हीओएच नावाच्या ऑनलाईन नियतकालिकाचे प्रकाशन होतेय. याच्या प्रकाशकांवर नियतकालिकाद्वारे काश्मीर खोऱयातील मुस्लीम तरुणांना कट्टरवादासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. हे कट्टरवादी नियतकालिक चालविणारे दीर्घकाळापासून तपास यंत्रणेला गुंगारा देत होते. विविध व्हीपीएन क्रमांकाद्वारे या संकेतस्थळाला संचालित करण्यात येत होते.
आयएस संबंधित सामग्री प्रसारित
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या या कटाप्रकरणी 29 जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. भारताविरोधात हिंसक कारवाया सुरू करण्यासाठी देशात मुस्लीम तरुणाईला कट्टरवादी करण्याचा कट आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी भारतात विविध ठिकाणांहून कार्यरत आहेत. त्यांनी बनावट-ऑनलाईन ओळख निर्माण करत स्वतःचे एक नेटवर्क उभे केले आहे. याच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटशी संबंधित सामग्री शेअर करण्यात येत असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले.
कर्नाटकात यापूर्वी छापे
एनआयएने याप्रकरणी 11 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला होता. यादरम्यान उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद लोण या आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी अनंतनाग जिल्हय़ातील अचबल भागाचे रहिवासी आहेत. एनआयएने कर्नाटकातील भटकळमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले होते आणि आयएसआयएस-व्हीओएच प्रकरणी मुख्य आरोपी जुफरी जवाहर दामुदीला अटक केली होती.
सज्जाद गुलच्या घरीही छापs
द रेजिस्टेन्स प्रंटचा (टीआरएफ) सज्जाद गुलच्या घरी देखील छापा टाकण्यात आल्याचे समजते. जम्मूच्या भटिंडीमध्ये 5 किलो आयईडीसोबत पकडण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याशी संबंधित टीआरएफचे हे प्रकरण आहे. जम्मूमध्ये आयईडी स्फोट घडवून आणण्याच्या लष्कर-ए-तोयबाच्या कटाप्रकरणी एनआयएच्या चौकशीकरता हे छापे टाकण्यात आले होते. हे छापे 27 जून रोजी सैन्याच्या तळावर ड्रोन हल्ल्यांच्या काही तासांपूर्वी झाले होते.