मुफ्तींनंतर अब्दुल्लांचा स्थानबद्ध केल्याचा दावा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला तसेच वडिल फारुख यांना अधिकाऱयांनी स्थानबद्ध केल्याचा दावा रविवारी केला आहे. तर पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही शनिवारी स्थानबद्ध करण्यात आल्याचे म्हटले होते.
ओमर यांनी रविवारी समाजमाध्यमांवर एक पोस्ट प्रसारित केली आहे. ‘ऑगस्ट 2019 नंतर हा नवा काश्मीर आहे. आम्हाला घरांमध्ये कुठल्याही कारणाशिवाय कैद करण्यात आले आहे. मला आणि वडिलांना घरात स्थानबद्ध करण्यासह माझी बहीण आणि त्यांच्या मुलांनाही घरात कैद करण्यात आल्याचा दावा ओमर यांनी केला आहे.
कुठलेही कारण न सांगता स्थानबद्ध करण्याचे लोकशाहीचे हे नवे प्रारुप असावे. पण घरात काम करणाऱया कर्मचाऱयांनाही येण्यापासून मज्जाव केला जात असल्याचे ओमर यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर फारुख अब्दुल्ला आणि ओमर यांना 5 ऑगस्ट 2019 रोजी स्थानबद्ध करण्यात आले होते. ओमर यांच्यावर पीएसए अंतर्गत लोकांना भडकविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
यापूर्वी राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबांनी एक चित्रफित प्रसारित करत स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप केला होता. बनावट चकमकीत मारले गेलेल्या अतहर मुश्ताकच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या प्रयत्नादरम्यान नेहमीप्रमाणे घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचे मुफ्ती म्हणाल्या.
कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर मुफ्तींनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना मागील वर्षी 27 नोव्हेंबर रोजी स्थानबद्धतेतून मुक्त करण्यात आले होते. तर काश्मीर पोलिसांनी मेहबूबा मुफ्ती यांना घरात स्थानबद्ध करण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुलवामा दौरा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.