वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये हवामानाने नवे वळण घेतले आहे. काश्मीरच्या अनेक भागांमध्ये रविवारी मोठय़ा प्रमाणावर हिमवृष्टी झाली आहे. पर्वतीय क्षेत्रांमध्ये दिवसभर हिमवृष्टी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत ही हिमवृष्टी सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
श्रीनगरच्या काही भागांमध्ये रविवारी पाऊसही पडला आहे. जोजिला येथे हिमवृष्टी झाल्याने श्रीनगर-लेह महामार्ग बंद झाला आहे, यामुळे वाहतूक रोखण्यात आली आहे. याचबरोबर राजौरीहून शोपियांपर्यंत जाणाऱया मुगल मार्गावरही पीर की गली येथे हिमवृष्टी झाल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक मार्ग राजौरी-पुंछला काश्मीरशी जोडतो.
जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक अद्याप सुरू आहे. रविवारी काश्मीरच्या गुरेज, अनंतनाग, बांदीपोरा, सोनमर्ग समवेत अनेक भागांमध्ये हिमवृष्टी झाली आहे. सद्यकाळात पर्यटकही काश्मीरमध्ये हिमवृष्टीचा आनंद घेत आहेत.