ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यात त्राल भागामध्ये आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार मारले.
तर दोन दहशतवादी परिसरात लपून बसले असून त्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्रालमधील हरी-पारी भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती खास सूत्रांकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधरे जवानांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व परिसराला चारही बाजूंनी घेरले. यावेळी जवानांच्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला तर अन्य दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.