वार्ताहर / कास :
कास पठार हंगाम सुरू झाल्यानंतर आलेल्या सुट्टीच्या पहिल्याच शनिवार व रविवारचा मुहूर्त साधत हजारो पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट देऊन फुलोत्सवाचा आनंद घेतला. कासच्या हंगामाची सुरुवात पंचवीस ऑगस्टपासून झाली. त्यानंतर हा पहिलाच सुट्यांचे वार आले आहेत. शनिवार, रविवार नंतर सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला यामुळे सलग सुट्यांमुळे कासवर चांगलीच गर्दी झाली होती. कास पठार कार्यकारी समितीकडून वाहनाना पठारावर बंदी असून पार्कींगपासून, बसद्वारे पर्यटकांना सोडण्यात येत होते.
पठारावर सद्यस्थितीत चवर, (रानहळद), जंगली आले, कापरू ( बिगोनिया ), पांचगणी अमरी, पंद, पांढरी हळदी, निसुरडी,
आभाळी, नभाळी, कुमुदिनी, ड्राॅसेरा इंडीका व बरमानी आदी फुले आली आहेत.
फुलांचे गालिचे अद्याप ही झालेले नसले तरी दुर्मिळ अशा प्रजाती पाहण्यात पर्यटक दंग होत आहेत. ऊनपावसाचा खेळ, मधूनच धुक्याची चादर, थंड वारा यामुळे कास वरील वातावरण आल्हाददायक झाले आहे. कास पठार पाहिल्यानंतर अनेक पर्यटक कास तलाव, बामणोली बोटींग, वजराई धबधबा एकीव धबधबा आदी ठिकाणांना भेटी देऊन तेथील निसर्गाचा आनंद लुटत आहेत. शनिवारी 1035 व रविवारी 1000 हून आधिक पर्यटकांनी कास पठारला भेट दिली आहे.