वार्ताहर / कास :
कास पठारावरील फुलांचा हंगाम दोन वर्षानंतर नुकताच पर्यटकांसाठी खुला झाला असल्याने पर्यटकांचा ओघही वाढु लागला आहे. विभागाने पठारावर येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग असेल तरच प्रवेश मिळेल असा नियम केला आहे. अनेक पर्यटक ऑनलाईन बुकिंगद्वारे शुल्क देऊन येत आहेत, मात्र अनेक पर्यटकांना वनविभाग पोलीस व वनसमीतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने मोफत प्रवेश दिला जात असल्याने वनसमीतीच्या उत्पनावर यांचा फटका बसत आहे. त्यामुळे फुकट पर्यटन करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नुतन उपवनसंरक्षक यांनी वेळेत रोख घालावी, अशी मागणी होत आहे.
कास पुष्प पठार हे जागतिक वारसास्थळ आहे. येथील रंगीबेरंगी नैसर्गीक रानफुलांचा हंगाम पहाण्यास देश विदेशातील दरवर्षी लाखो पर्यटक पठारवर येत असतात. त्यामुळे समितीला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, अलीकडे काही तळीराम पठारवर ठाण मांडुन बसले असून, कोणी त्याच्या हितसंबधीत पठारावर आले की विनाशुल्क त्यांना प्रवेश दिला जातो आहे. तर काही दलाल याठिकाणी काम करत असून ते परस्पर पैसे घेऊन ऑनलाईन बुकिंग नसणाऱ्या पर्यटकांना पठारावर सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,व स्वतःचे खिसे भरत आहेत.