वार्ताहर / कुडाळ :
जागतिक वारसा स्थळ असलेल्या पुष्प पठार कासचा हंगाम समाप्तीकडे आला असून, पंधरा ऑक्टोबर पासून ऑनलाईन बुकींग बंद करण्यात आले आहे. पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धम्मक छटा अद्याप ही पाहावयास मिळत आहे. ऑनलाईन बुकींग बंद करण्यात आले असले तरी येणाऱ्या पर्यटकांना ऑफलाईन पद्धतीने ज्यांना जाळीच्या आतमध्ये जावून असणारी फुले पाहायची आहेत. त्यांना तिकीट घेऊन फुले पाहता येतील.
कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रानफुलांचा हंगाम समाप्ती बरोबरच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाया पर्यटकांचा ओघही ओसरल्याचे दिसत आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेंरगी फुलांचा हंगाम 25 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राज्यासह देशविदेशातील पर्यटकांनी पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आंनद लुटला. मात्र, पठारावर सर्वात जास्त आणि प्रमुख आकर्षित ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले आतिपावसामुळे अगदी कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळाली. मात्र पांढरा गेंद, निळी जांभळी सितेची आसव, कापरू, पिवळा मिकी माऊस व कुमुदिनी तळ्यातील कमळे हि जास्त प्रमाणात बहरल्याने पर्यटकांची खास आकर्षण ठरत होती. आता पठारावर पांढरा गेंद, पिवळी मिकीमाऊस व ईतर जातीची फुले आहेत मात्र जास्त प्रमाणात गवत वाढल्याने ती कमी प्रमाणात दिसत आहेत. पठारवरील फुलांचे प्रमाण कमी झाल्याने आता येणारे पर्यटक कास तलाव, कोयना जलाशयातील बामणोली बोट क्लबला भेट देऊन बोटिंगचा आनंद लुटत आहेत.