युवकाचे जगभरात झाले नाव
जपानमधील 38 वर्षीय शोजी मोरीमोटो अत्यंत अनोख्या प्रकारचा जॉब करतात. प्रत्यक्षात ते लोकांसोबत भाडेतत्वावर जातात. शोजी स्वतःलाच भाडय़ाने देतात. ऐकण्यास ही बाब विचित्र वाटत असली तरीही शोजी मोरीमोटो असे करून लाखो रुपये कमावतात.
शोजी हे जपानच्या टोकियो शहरात राहतात. अनोळखी लोक त्यांना भाडेतत्वार घेऊन जातात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतात. शोजी मोरीमोटो कुठलेच काम करत नाहीत, परंतु एका ग्राहकाकडून ते 10 हजार येन (सुमारे 7 हजार रुपये) वसूल करतात. याचबरोबर प्रवास अन् खाण्याचा खर्च वेगळय़ा प्रकारे आकारतात. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांना त्यांनी ही सेवा पुरविली आहे. प्रतिदिन दोन ते तीन जण त्यांना भाडेतत्वावर नेत असतात, आतापर्यंत त्यांनी कित्येक लाख रुपये कमाविले आहेत.
भाडय़ाने का नेतात?
अनेक लोक शोजी यांना भाडय़ाने नेतात, कारण ते कंटाळलेले असतात किंवा एकाकीपणाचे शिकार ठरले असतात. शोजी लोकांसोबत बसतात, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारतात, काही गोष्टींना प्रतिसाद देता आणि लंच/डिनर करून परततात. अनेक लोकांना कोणीतरी स्वतःचे म्हणणे ऐकणारा हवा असतो, घटस्फोटित व्यक्ती, आरोग्याच्या समस्येने त्रस्त इसम किंवा अन्य कारणांनी त्रस्त लोक शोजी यांना भेटत असतात. एका व्यक्तीने शोजी यांना आपण हत्या केली असल्याचेही सांगितले होते. काही लोक मला घराची सफाई, कपडे धुणे, न्यूड पोझ किंवा मित्र होण्यासाठी सांगतात. परंतु अशी कामे करत नसल्याचे शोजी सांगतात. ते अत्यंत व्यावसायिकपणे लोकांसोबत राहतात आणि मित्र होण्यास स्पष्ट नकार देतात. मी स्वतःहून कधीच संभाषण सुरू करत नसल्याचे शोजी म्हणाले.
बेरोजगारी मिटविण्यासाठी काम
शोजी हे 2018 मध्ये बेरोजगार होते, तेव्हा त्यांनी हा अजब जॉब सुरू केला होता. स्वतःच्या सेवांची जाहिरात करताना त्यांनी ‘डू नथिंग रेंट-ए-मॅन’ नावाचे एक ट्विटर अकौंट सुरू केले, ज्यावर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. लोकांचा एकाकीपणा आणि त्यांच्या भावना समजू शकत असल्याने ते मला बोलावत असावेत असे शोजी यांनी सांगितले आहे. जपानचे सरकार नागरिकांमधील एकाकीपणा आणि सेशल आयसोलेशनची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.