पैसे जोडून खरेदी केली जमीन
नवा देश स्थापन केल्याची घोषणा
बेलिज हा एक कॅरेबियन देश आहे. या देशाकडे 1.2 एकर आकाराचे निर्जन बेट होते. हे बेट काही लोकांनी मिळून खरेदी केले आणि आता या लोकांनी याला नवा देश बनविण्याचा दावा केला आहे. परंतु या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मान्यता मिळालेली नाही. याचमुळे याला मायक्रो नेशन म्हटले जातेय. क्राउंड फंडद्वारे हे बेट खरेदी करण्यासाठी पैसे जमविण्यात आले.
एका वेबसाइटद्वारे या बेटावरील एक हिस्सा खरेदी केला जाऊ शकतो आणि नागरिकत्वही मिळविता येते. 14 मार्चपर्यंत या बेटावरील गुंतवणुकदारांची संख्या 103 झाली तर नागरिकांची संख्या 350 पर्यंत पोहोचली आहे. या देशाचे अधिकृत नाव प्रिन्सिपलिटी ऑफ आइसलँडिया असे ठेवण्यात आले आहे. या देशाजवळ स्वतःचा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, सरकार आणि सीक्रेट पोलीस देखील आहे. या आयलँडचा आकार कॉफी बीनसारखा आहे.
लेट्स बाय ऍन आयलँडचे मार्शल मेयर सहसंस्थापक आहेत. त्यांनी आणि त्यांच्या ग्रूपने मिळून कॉफी कॅये नावाच्या बेटासाठी 1 कोटी 90 लाख रुपये क्राउड फंडद्वारे जमविले होते. तर याची किंमत 1 कोटी 37 लाख (याचबरोबर कर) झाली होती. या बेटाची विक्री डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाली. तर या बेटाच्या एका हिस्स्याची किंमत अता 2 लाख 48 हजार रुपयांच्या आसपास आहे. याचे 100 शेअर आतापर्यंत विकले गेले आहेत.
हे बेट बेलिज सिटीपासून 15 मिनिटांच्या बोट राइडनंतर येते. 2022 च्या प्रारंभापासूनच अनेक गुंतवणूकदार आणि पर्यटक येथे पोहोचले आहेत असे मार्शल मेयर यांनी सांगितले. या मायक्रोनेशनमध्ये फिरण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात. मेयर पहिल्यांदा 13 लोकांच्या समुहासोबत या बेटावर फिरण्यासाठी आले होते. मेयर समवेत अनेक अन्य गुंतवणुकदारांनी येथे कँपिंग केले आहे.
कॉफी कॅयेमध्ये पैसे गुंतविणारा किंवा येथे फिरण्यास येणारा येथील नागरिक होऊ शकतो. याकरता पासपोर्टचीही गरज भासणार आहे. याचबरोबर लॉर्ड किंवा लेडी ऑफ आयलँडची पदवी अत्यंत कमी शुल्कात खरेदी करता येणार आहे. परंतु यासाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही.