प्रतिनिधी / बेळगाव
सीडॉक धारवाड व काहेर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 30 दिवसांच्या कौशल्य आधारित कृषी व खाद्य उत्पादन उद्यमशीलता या प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच झाली. या शिबिरात विविध प्रकारच्या ग्रेव्हीज, केक, ब्रेड, कुकीज व अन्य बेकरी उत्पादने यांचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करून शिबिरार्थींना ते पदार्थ करावयास सांगण्यात आले. केएलई स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे हे शिबिर झाले.
सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून काहेर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार यांनी शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला. सीडॉकचे संचालक डॉ. वीरण्णा एस. एच. यांनी उत्तर कर्नाटकात खाद्य उद्योगाचे महत्त्व स्पष्ट केले. चेअरमन बी. एम. गोटूर यांनी शिबिरामुळे लघुउद्योग किंवा गृहोद्योग सुरू करता येईल, असे सांगितले. प्रशिक्षिका अश्विनी धगाटे यांनी स्वागत तर डॉ. नवनीत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनायक हारुगोप यांनी आभार मानले.