पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन
सानेगुरुजीतील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
प्रतिनिधी / काेल्हापूर
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र या यंत्रणेला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणे शक्य नाही. गेल्या सहा महिन्यापासून जीव धोक्यात घालून ही यंत्रणा अहोरात्र कोरोना विरुद्ध लढा देत आहे. आता त्यांच्यासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ आली आहे. यासाठी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
साने गुरुजी वसाहत येथे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब, महापालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने मैत्रागंण अपार्टमेंटमध्ये 30बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, रोटरीचे रुषिकेश केसकर प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकांने मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीत न जाणे या गोष्टींचे प्रकर्षाने पालन करणे गरजेचे आहे. तसेच शहरातील प्रभाग समित्यांनी अधिक दक्ष राहून कोरोना संसर्गितांचा शोध घेऊन त्यांची तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार या गोष्टींना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
आज कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जोराने वाढला. लवकर निदान व्हावं यासाठी तत्काळ दोन लॅब सुरू केल्या. रुग्ण लवकर उपचार घेत नसल्याने आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे लक्षणे दिसली की लगेच उपचार घेणे हे गरजेचे आहे. रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता उपनगरात कोविड केअर सेंटर होणे गरजेचे होते. आज या कोविड केअर सेंटरमुळे उपनगरातील रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच या ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोना उपाययोजना दूरदृष्टी ठेवूनच करत आहोत. आयसोलेशन आता ७५ बेडचे केलंय. शहरासह उपनगरातही आता कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेत. यासाठी लोकांचा सहभाग मिळाला. कोल्हापूरकरांनी भरभरून मदत केली. या ठिकाणी दोन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगून प्रत्येकाने स्वतः कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थितीतांना शपथ दिली.
मदतीचा हात
गटनेते शारंगधर देशमुख यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा आपला मानस होता, तो आज पूर्णत्वास गेला. याठिकाणी 28 ऑक्सिजन बेड व 2 व्हेंटिलेटर बेड असे एकूण 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून या सेंटरला रोटरी क्लबने तीस बेड, स्ट्रेचर, क्रॅश कोर्ट, व्हील चेअर उपलब्ध करून दिले. तर संयुक्त उपनगर शिवजयंती समितीने ऑक्सिजनच्या सुविधेसाठी १लाख ७५ हजार रुपये दिले. महावितरण उपविभाग कागल आणि महापालिका पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभाग तसेच अर्जुन ग्रुप आणि महेश चव्हाण यांच्या मदतीतून हे कोविड केअर सेंटर उभं केल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी किरण पाटील, महापालिकेच आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, डॉ. विद्या काळे आदी उपस्थित होते.