सीआयडीची कारवाई, 14 दिवस पोलीस कोठडी
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणाचा ‘किंगपिन’ किरण विरनगौडर (वय 37) याला रविवारी सीआयडीने हानगलजवळ अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी येथील विशेष न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून सीआयडीने त्याला ताब्यात घेतले आहे.
संकेश्वर पोलीस स्थानकात सोमवारी किरणविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किरण व काही सरकारी अधिकाऱयांविरुध्द कलम 7ए, 7(सी) भ्रष्टाचार निर्मुलन कायदा 1988 आणि कलम 120बी सहकलम 35 व 37 अन्वये संकेश्वर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळपासून संकेश्वर पोलीस स्थानकात नेवून किरणची कसून चौकशी करण्यात आली. सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक नरसिंहमूर्ती यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पकडलेली कार सोडविण्यासाठी 70 लाख रुपयांची मागणी करुन शेवटी 30 लाख रुपयांना व्यवहार ठरविण्यात आला होता. त्यापैकी 25 लाख रुपये किरणने घेतले होते.
सीआयडी तपासात ही गोष्ट उघडकीस आली होती. पैशाचा व्यवहार संकेश्वर येथे झाला होता. त्यामुळे सीआयडीच्या अधिकाऱयांनी संकेश्वर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. किरण बरोबरच काही सरकारी अधिकारी असा उल्लेख एफआयआरमध्ये असून चौकशी अंती व्यवहार ठरविणारे अधिकारी कोण? त्याचा उलगडा होणार आहे. सध्या तरी पोलीस अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळूर येथील तिलक पुजारी या सराफी व्यवसायीकाच्या केए 19 एमएच 9451 क्रमांकाची कार मंगळूरहून कोल्हापूरला जात होती. 9 जानेवारी रोजी रात्री यमकनमर्डी पोलीसांनी अधिकाऱयांच्या सांगण्यावरुन हत्तरगी टोल नाक्याजवळ ही कार अडविली होती. त्यानंतर कारच्या एअरबॅगच्या ठिकाणी असलेले 4 किलो 972 ग्रॅम सोन्याचे दागिने परस्पर चोरुन या दागिन्यांची विक्री करण्यात आली होती.
यासंबंधीही सीआयडीच्या अधिकाऱयांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी पकडलेली कार सोडण्यासाठी तिलक पुजारी यांनी किरणशी संपर्क साधला. त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांसह कार सोडविण्यासाठी तिलक पुजारी यांच्याकडे 70 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 10 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता किरणच्या कारमधून बेळगावला येताना पैशांची मागणी करण्यात आली.
10 जानेवारी रोजी रात्री संकेश्वर येथील साई लॉजमध्ये 15 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर दुसऱया दिवशी 11 जानेवारी रोजी धारवाड येथील उच्च न्यायालयासमोर असलेल्या कॅफे कॉफी-डे जवळ 10 लाख रुपये घेण्यात आले. किरणने ही रक्कम आपल्या स्कोडा कारमधून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.
25 लाख रुपये घेवूनही कार सोडविण्यात आली नाही. न्यायालयाच्या आदेशावरुन यमकनमर्डी पोलीस स्थानकातून कार बाहेर काढण्याआधीच पोलीस अधिकाऱयांच्या मदतीने सोन्याचे दागिने चोरुन हुबळी येथील जे. डी. नामक एका सराफाला या दागिन्यांची विक्री करण्यात आली होती. दागिन्यांच्या विक्रीनंतर आपण किती सज्जन आहोत हे भासविण्यासाठी 17 एप्रिल 2021 रोजी किरणने तिलक पुजारी यांना 25 लाख रुपये परत केले होते.
सीआयडी चौकशीत हा सारा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात वरि÷ पोलीस अधिकाऱयांचाही सहभाग आहे. रविवारी हानगलजवळ किरणला अटक केल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱयांनी त्याला संकेश्वरला नेले. सोमवारी दुपारपर्यंत त्याला संकेश्वर पोलीस स्थानकात ठेवण्यात आले होते. सायंकाळी येथील तृतिय अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने किरण विरनगौडरला 14 दिवसांसाठी कोठडीत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने या मागणीचा पुरस्कार केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन सीआयडीच्या अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेवून चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेले आहेत. चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येणार आहे.
पोलीस अधिकाऱयांचे धाबे दणाणले
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. सीआयडी पथकातील अधिकाऱयांनी बेळगाव शहर व तालुक्मयात सध्या कार्यरत असलेल्या व येथून बदली झालेल्या काही पोलीस अधिकाऱयांविषयी माहिती जमविण्याचे काम हाती घेतले आहे. हे अधिकारी सोने चोरी प्रकरणाचा किंगपिन किरण विरनगौडर याच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे. 14 दिवसांच्या चौकशीत या प्रकरणाला कलाटणी मिळणार आहे.