ऑनलाईन जुगार ‘प्रश्नी उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश
प्रतिनिधी / इचलकरंजी
‘किंग्जक्लब’, लकीस्टार’ यासारख्या ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॅसिनो हा जुगार चालवून अनेकांना देशोधडीला लावण्यात आले आहे. या प्रकरणी येथील संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहीत याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार, पोलीस महासंचालक आणि या जुगाराचे कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील डिलर, एजंट यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या रॅकेटमधील बड्या धेंडांचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाईसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
किंग्जक्लब, लकीस्टार यासारख्या गेमद्वारे ऑनलाईन कॅसिनो अर्थात जुगार चालवण्यात येत असून या गेमच्या सॉफ्टवेअरमध्ये जुगारींची लूट होईल अशा पद्धतीने बनावटगिरी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गोरगरीबांची या गेमच्या माध्यमातून लूट झाली आहे. काहींनी मोठी फसवणूक झाल्याने आत्महत्याही केल्या आहेत तर अनेकाना मालमत्ता, शेतजमीनी विकाव्या लागल्या असून त्याच्या संसाराची वाताहत झाली आहे. काही महिन्यापूर्वीपर्यंत हा जुगार राजरोसपणे दुकाने थाटून चालवण्यात येत होता. दुकानात संगणकावर गेमचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इंटरनेटच्या माध्यमातून हा जुगार चालवण्यात येतो.
रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, कोल्हापूर, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी कोल्हापूर पोलिसांनी अशा जुगार अडुयावर वेळोवेळी छापे टाकले आहेत. पण या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या जुगारातील बडी धेंडे मालक कोण, हेराफेरी असलेले सॉफ्टवेअर कोणी विकसित केले, ते कोठून चालवण्यात येते. जुगारीची नेमकी कशी फसवणूक होते. याचा तपास जाणीवपूर्वक करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा जुगार आजही राजरोसपणे सुरू असून जुगारीची फसवणूक होत आहे.
त्यामुळे संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचे पुरावे देखील सादर केले आहेत. या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला द्यावेत अशी विनंती केली आहे. या याचिकेत राज्य सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग, केंद्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राज्याचे पोलीस महासंचालक आणि जुगाराचे डिलर इंदरचंद अग्रवाल, अमेय बडवे, तरुण अग्रवाल आदिना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर न्या. माधव जामदार व न्या. ए.ए.सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेची गंभीर दखल घेत खंडपीठाने या जुगाराच्या मालकांचा पोलीसानी शोध घ्यावा व याचिकाकर्त्यांना त्याबाबत माहिती असेल ती न्यायालयाला द्यावी अशी सूचना केली.
या प्रकरणात राज्य सरकार तर्फे मुख्य सरकारी वकील ठाकरे स्वतः बाजू मांडतील असे सरकारी पक्षातर्फे पूर्णिमा कंथारिया यांनी सांगितले. यावर खंडपीठाने प्रतिवादी क्रमांक दोन केंद्र सरकार यांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले व पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी निश्चित केली, बाळ महाराज यांच्या तर्फे अॅड, सागर कुर्सिजा व अॅड. दिपाली केदार यांनी बाजू मांडली.