आयपीएल 13 : आज होणार कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध लढत
वृत्तसंस्था / दुबई
पहिल्या सामन्यात पंचांनी चुकीचा ‘शॉर्ट रन’ दिल्याने विजयाची संधी हुकलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ निराशा मागे टाकून गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी दोन हात करणार आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 19 व्या षटकातील तिसऱया चेंडूवर स्क्वेअरलेग पंचांनी पंजाबच्या ख्रिस जॉर्डनने शॉर्ट रन घेतल्याचा इशारा केला. या निर्णयामुळे अतिशय चुरशीची झालेली ही लढत पंजाबला गमवावी लागली होती. मात्र पंजाबने या निर्णयाविरुद्ध सामनाधिकाऱयांकडे अपील केले आहे. पण केएल राहुलचा संघ ही घटना विसरून हाती असलेल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. याउलट आरसीबीने या मोसमात विजयी सुरुवात करताना सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात केली. यामुळे या मोसमात तरी त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होण्याची आशा वाटत आहे.
देवदत्त पडिक्कलने आयपीएल कारकिर्दीची सुरुवातच दिमाखदार अर्धशतकाने केली असून याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. डीव्हिलियर्सनेही या सामन्यात अर्धशतक झळकवले होते, हाच जोम पुढे चालू ठेवण्याचा त्याचा इरादा असेल. कोहली व फिंच दोघांनीही सोमवारी उपयुक्त धावा केल्या. पण आता त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करण्यास ते उत्सुक झाले आहेत.
युजवेंद्र चहल हा आरसीबीचा प्रमुख गोलंदाज असून पहिल्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र दक्षिण आफ्रिकन ख्रिस मॉरिसची उणीव त्यांना पुन्हा एकदा जाणवण्याची शक्यता आहे. त्याला स्नायू दुखापत झाली आहे. आरसीबीने त्याला 10 कोटीला खरेदी केले आहे. उमेश यादवला आयपीएलमध्ये अजूनही लय सापडली नसल्याने त्याने भरपूर धावा दिल्या आहेत. पहिल्या सामन्यातील त्याचे प्रदर्शन पाहता त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. मध्यफळीत मोईन अलीला सामावून घेतले जाते का, हे पहावे लागेल. जोश फिलिपला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडले असल्याने मोईन मअलीला अंतिम संघात डेल स्टीनच्या जागी संधी मिळू शकते.
पंजाबसाठी मयांक अगरवाल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला. राहुल, मॅक्सवेल, निकोलस पूरन यांच्याकडे सामना हिसकावून घेण्याची क्षमता असल्याने त्यांच्याकडून तशा कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. बिग हिटर ख्रिस गेलला त्यांनी पहिल्या सामन्यात वगळले होते. त्याला तसेच अष्टपैलू जिमी नीशमला यावेळी अंतिम संघात दिले जाण्याची अपेक्षा आहे. शमी हा त्यांच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख असेल तर पहिल्या सामन्यात प्रभावी ठरलेला युवा लेगस्पिनर रवि बिश्नोईचेही स्थान राखले जाईल.