ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच काल महाराष्ट्रातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी राज्यात 66 हजार 159 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 68 हजार 537 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी ही संख्या 67 हजार 752 इतकी होती. तर निदान झालेल्या रुग्णांची संख्या 63 हजार 309 इतकी होती. बुधवारच्या तुलनेत काल वाढ झाली असून हा फरक 2 हजार 850 इतका आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 771 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 45 लाख 39 हजार 553 वर पोहचली आहे. यातील 37 लाख 99 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 67 हजार 985 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.69 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 70 हजार 301 रुग्ण उपचार घेत आहेत.
- 41,19,759 व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 68 लाख 16 हजार 075 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45 लाख 39 हजार 553 (16.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41 लाख 19 हजार 759 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 30 हजार 118 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 70 हजार 301 इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक 1 लाख 04 हजार 529 इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 67 हजार 255 इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 56 हजार 973 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 80 हजार 028 इतकी झाली आहे. आणि नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 52 हजार 954 इतकी आहे.