किर्गिस्तानातील प्रथेवरून संयुक्त राष्ट्रसंघही चिंतेत
किर्गिस्तानमध्ये एका महिलेचे बळजबरीने विवाह करण्यासाठी अपहरण करण्यात आले आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह एका वाहनात आढळून आला. या घटनेनंतर देशात या ‘प्रथे’च्या विरोधात तीव्र निदर्शने होऊ लागली आहेत.
27 वर्षीय एजादा केनेतबेकोवा हिला तीन जण बळजबरीने स्वतःच्या कारमधून नेत होते. यातील एक व्यक्ती एजादासोबत विवाह करू इच्छित होता. याचमुळे तिचे अपहरण केले जात होते. या महिलेच्या अपहरणाची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण चित्रफित उपलब्ध असूनही पोलीस कारचा शोध घेऊ शकले नव्हते. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये ही कार तसेच एजादाचा मृतदेह सापडला होता.
या घटनेनंतर अनेक महिला आणि पुरुष निदर्शनांसाठी रस्त्यांवर उतरले आहेत. एजादासोबत एका अपहरणकर्त्याचा मृतदेह देखील सापडला आहे. तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित अपहरणकर्त्याने स्वतःचा जीव घेतल्याचे मानले जात आहे.
किर्गिस्तानमध्ये विवाहासाठी महिलांच्या अपहरणाची संस्कृती त्याची एक प्राचीन परंपरा राहिली आहे. तर ही संकल्पना या मध्य आशियाई देशात मागील काही दशकांपासून सुरू असल्याचे काही संशोधकांचे मानणे आहे.
2013 सालीच ही परंपरा संपुष्टात आणली गेली होती, पण अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसते. तसेच महिलांवरही अशा स्थितीत भीतीचे वातावरण असल्याने त्या अनेकदा तक्रार नोंदवत नाहीत.
किर्गिस्तानमध्ये कुटुंबीय आणि नातेवाईक एका निश्चित वयानंतर मुलांवर विवाहासाठी दबाव आणतात आणि देशात महिलांचे अपहरण करून घरी आणणे अत्यंत स्वस्त आणि प्रभावशाली पद्धत मानली जात राहिली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानेही किर्गिस्तानच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशात प्रत्येक 5 पैकी एका महिलेचा विवाह बळजबरीने अपहरणानंतर होत असतो. या देशात अनेक जण याला स्वतःच्या संस्कृतीचा हिस्सा मानत आले आहेत.