पर्यटनासाठी आला असता दुर्घटना : मृतदेह शोधण्यासाठी आज पुन्हा मोहीम
वार्ताहर/ कुदनूर
किटवाड येथे लघु पाटबंधारा तलावात बुडून बेळगावच्या तरुणाचा मृत्यू झाला. अभिषेक सज्जन (वय 25) रा. माळमारुती-श्रीनगर परिसर, बेळगाव असे त्याचे नाव आहे. सदर घटना रविवार दि. 20 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी सायंकाळीपर्यंत शोधमोहीम सुरू होती.
अभिषेक हा तरुण रविवार सुटीनिमित्त पर्यटनासाठी किटवाड येथील धबधब्याकडे आला होता. अभिषेकचे कुटुंबीयही आले होते. किटवाड धबधबा हा कालकुंद्रीकडील लघु पाटबंधारा तलाव क्र. 1 मधून ओव्हरफ्लो होणाऱया पाण्यातून निर्माण झाला आहे. सध्या तलावातून पाणी ओव्हरफ्लो होत नसल्यामुळे धबधबा म्हणावा तसा प्रवाहित होत नाही. मात्र, परिसराचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असल्यामुळे पर्यटकांची रीघ सुरूच आहे. यावेळी अभिषेकला कालकुंद्रीकडील असलेल्या लघु पाटबंधारे तलावाच्या पाण्यात उतरण्याचा मोह झाला. तलावात सुमारे 50 फुटावर आत गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला. दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. तो बुडाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. तलावाच्या पाण्याची खोली अधिक असल्याने मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले नाही. सायंकाळ झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. मात्र, सायंकाळी नागनवाडी येथील व्यक्तीलाही मृतदेह शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. अद्याप या घटनेची नोंद पोलिसात झालेली नाही. अभिषेकच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
कुटुंबीयांनी फोडला हंबरडा…
अभिषेक हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, हैदराबाद येथील कंपनीत ऍनॅलिस्ट म्हणून काम करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो सध्या बेळगाव येथून आपल्या घरातूनच कंपनीचे काम करत होता. त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला होता.