दोन जणांची बिनविरोध निवड : निवडणूक होणार चुरशीची
वार्ताहर/ किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. किणये ग्रामपंचायतीमध्ये एकूण 22 जागा आहेत. यातील दोन जागांची निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित 20 जागांसाठी सध्या 62 उमेदवार रिंगणात आहेत.
किणये ग्रामपंचायतीमध्ये किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, नावगे, बामणवाडी, जानेवाडी व कर्ले या गावांचा समावेश आहे. या भागात म. ए. समितीसह भाजप, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ग्रा. पं. निवडणूक असल्याने ग्राम विकास आघाडी अथवा अपक्ष उमेदवार म्हणूनच अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काही राजकीय पक्षांचे पाठबळ घेऊन रिंगणात उतरले आहेत.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तरुणांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. सोमवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आपले निवडणुकीचे चिन्ह व वॉर्डातील अनुक्रम घेण्यासाठी सोमवारी दुपारपासून उमेदवारांची धावपळ सुरू होती. मंगळवारी निवडणूक प्रचाराची परिपत्रके यांची छपाई करण्यात अनेक उमेदवार व कार्यकर्ते दंग होते.
किणये ग्रा. पं. मध्ये 7 वॉर्ड असून एकूण 22 जागांपैकी नावगे येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील एक महिला, रणकुंडये येथील एका महिलेची बिनविरोध निवड झाली आहे.