पिरनवाडी येथून ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ
वार्ताहर/ किणये
ग्रामस्थ, पंच कमिटी, विविध संघ-संघटना व शिवप्रेमी नागरिक किणये यांच्यावतीने गावात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाचा आगमन सोहळा शनिवारी मोठय़ा उत्साहात पार पडला.
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मिरवणुकीत ढोल-ताशा व टाळ-मृदंगाचा गजर आणि महिलांसह तरुणांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येणार असल्याने गावकऱयांमध्ये उत्साह दिसून आला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तरुणांनी पांढरे वस्त्र, डोक्यावर भगवे फेटे व हातात भगवे ध्वज होते. यामुळे ही मिरवणूक भगवेमय बनली होती.
किणये ग्रामस्थांनी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. गावच्या एकजुटीतून हा संकल्प पूर्ण होत आहे. अनगोळ येथील विक्रम पाटील यांनी पंचधातूची 12 फुटी अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनविली आहे.
शनिवारी सकाळी अनगोळ येथे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे व मिरवणूक गाडय़ाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर किणये येथील शिवभक्तांनी पिरनवाडी येथील क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
पिरनवाडी, हुंचेनहट्टी क्रॉस, संतिबस्तवाड, नावगे क्रॉस, शिवनगर, बहाद्दरवाडी क्रॉस मार्गे रात्री उशिरा ही मिरवणूक किणये गावात पोहोचली.
रविवार दि. 10 रोजी सकाळी 9 पासून किणये गावात शिवरायांची मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. वडगाव ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेऊन सहकार्य केले.
हुंचेनहट्टी क्रॉस येथे किणये गावातील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक दळवी यांनी सर्व शिवभक्तांना दुपारी भोजनाची व्यवस्था केली होती. दि. 2 मे रोजी शिव जयंतीनिमित्त किणये गावात छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मुस्लीम बांधवांकडूनही मिरवणुकीचे स्वागत
पिरनवाडी येथील फुल-हार विक्रेते अन्सारी बंधूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन घडले.