कोरोना विषाणूमुळे हातांच्या स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आलं आहे. घरी आल्यावर किंवा कोणत्याही पृष्ठभागला स्पर्श केल्यावर साबणाने किमान 20 सेकंद हात धुवायला हवेत. बाहेर असताना हँड सॅनिटायझर्स वापरले जातात. हे सॅनिटायझर्स जंतूंपासून किती काळ संरक्षण देतात हे तुम्हाला माहीत आहे का? हँड सॅनिटायझर्सचा प्रभाव फक्त दोन मिनिटं राहतो. सॅनिटायझर लावल्यानंतर दीर्घकाळपर्यंत संरक्षण मिळेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे एकदा सॅनिटायझर लावल्यावर पुन्हा कशाला हात लागला तर तो पुन्हा वापरावा लागेल. म्हणूनच फक्त घराबाहेर असताना आणि त्यातही साबणाने हात धुण्याची सोय नसल्यास सॅनिटायझर वापरावा. साबणाने हात धुणं हाच जंतूपासून बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे.
संसर्गापासून बचाव करण्यासाठी चेहरा, नाक आणि डोळ्यांना वारंवार हात लावणं टाळा. तसंच जेवण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या. अल्कोहोलचं प्रमाण 60 टक्के असणारा सॅनिटायझर विकत घ्या. तसंच हातांवर सॅनिटायझरचे थेंब टाकल्यानंतर साधरण 30 सेकंद हात चोळणं आवश्यक आहे. तुम्ही दहा मिनिटांपूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ केले असतील तरी जेवणाआधी किंवा चेहर्याला हात लावण्याआधी पुन्हा सॅनिटायझर लावा. सॅनिटायझर हा साबणाने हात धुण्याला पर्याय ठरू शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी निकड असेल तरच त्याचा वापर करा.