स्पेनमधील डॉक्टरांनी मांडली व्यथा : कोरोना विषाणूच्या संकटामुळे हवालदिल
स्पेनमध्ये कोरोनाच्या बळींचा आकडा मागील आठवडय़ातच चीनपेक्षा अधिक झाला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्पेनच्या पंतप्रधानांनी देशातील टाळेबंदी अधिकच कठोर केली आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित नसलेल्या लोकांना दोन आठवडय़ांपर्यंत घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. तर डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र या लढाईत सामील झाले आहेत. याचा प्रभाव अनेकप्रकारे त्यांच्या जीवनावरही पडू लागला आहे.
मास्क, ग्लोव्ह्जचा अभाव
माद्रिदच्या एका रुग्णालयात 265 बेड्स असून 700 रुग्ण दाखल आहेत. हजारो लोक खुर्चीवर बसून किंवा जमिनीवर झोपून आहेत. आमच्याकडे वैयक्तिक सुरक्षेसाठी मास्क तसेच ग्लोव्ह्ज देखील नाहीत. तसेच वॉटरप्रूफ गाऊनही उपलब्ध नाही. या महामारीसमोर आम्ही वस्त्रांशिवाय उभे असल्याचे वाटत असल्याचे उद्गार एका परिचारिकेने काढले आहेत.
आजारी असूनही सेवेत
10 दिवसांपासून तापाची लक्षणे दिसून येत आहेत. आम्ही आमच्या कुटुंब किंवा सहकाऱयांपर्यंत संसर्ग फैलावत आहोत की नाही हे देखील समजू शकत नाही. कमी लक्षणे दिसून येणाऱया लोकांना काम करत रहावे लागणार असल्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱयांनी दिला आहे. हा केवळ एक आजार नसून एका खराब सरकारची महामारी असल्याची व्यथा आरोग्य कर्मचाऱयाने मांडली आहे.
बेजबाबदार सरकार
आमच्यापैकी बहुतांश जण रोज काम संपवून रडत घरी परततात. हा आमच्या कारकीर्दीतील सर्वात अवघड काळ असल्याचे एका डॉक्टरने म्हटले आहे. तर सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हे संकट वाढल्याचा आरोप एका परिचारिकेने केला आहे.