वृत्तसंस्था/ पॅरिस
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ओर्लेन्स मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मलेशियाच्या वेईचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात के. श्रीकांतने वेईचा 21-17, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 46 मिनिटांत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि धुव कपिला यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना इंग्लंडच्या इस्टॉन आणि रुस यांचा 21-11, 21-12 असा पराभव केला. त्याचप्रमाणे भारताच्या कृष्णा प्रसाद गर्ग आणि विष्णूवर्धन गौड यांनीही पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना डेन्मार्कच्या पेमर आणि रिनशोज यांच्यावर 21-7, 21-13 अशी मात केली. मिश्र दुहेरीत भारताच्या धुव कपिला आणि अश्विनी पोनाप्पा यांनी इंग्लंडच्या केलॉम हेमिंग आणि व्हिक्टोरिया विलीयम्स यांचा 21-12, 21-18 अशा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.