थायलंड ओपन ः सायना, साई प्रणीत, आकर्षी, चलिहा, सुमित रेड्डी-अश्विनी पराभूत
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताचा प्रमुख बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने येथे सुरू झालेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला तर महिला एकेरीत सायना नेहवालचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. मालविका बनसोडने मात्र संघर्षपूर्ण विजय मिळवित दुसरी फेरी गाठली आहे.
या बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धेत श्रीकांतला आठवे मानांकन देण्यात आले असून त्याने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लेव्हर्डेझचा 18-21, 21-10, 21-16 असा 49 मिनिटांच्या खेळात पराभव केला. त्याची पुढील लढत आयर्लंडच्या पात्रता फेरीतून आलेल्या एन्हात एन्ग्युएनविरुद्ध होईल. एन्ग्युएनने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्तियन सोलबर्ग व्हिटिंगहसचा 21-12, 23-21 असा पराभव केला. महिला एकेरीत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणाऱया सायना नेहवालला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. तिने जोरदार संघर्ष केला, मात्र कोरियाच्या किम गा युनकडून तिला 21-11, 15-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
पात्रतेतून आलेल्या भारताच्या अश्मिता चलिहा, आकर्षी कश्यप यांनाही पराभव स्वीकारावा लागला तर मालविका बनसोडने संघर्षपूर्ण विजय मिळवित आगेकूच केली. चलिहाला थायलंडच्या सातव्या मानांकित रॅटचॅनोक इंटेनॉनने 21-10, 21-15 असे हरविले तर आकर्षीला कॅनडाच्या मिशेली ली हिने 21-13, 21-18 असे नमविले. मालविकाने युक्रेनच्या मारिया अल्टिनावर 17-21, 21-15, 21-11 अशी मात केली. तिची दुसरी लढत डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनविरुद्ध होणार आहे.
मिश्र दुहेरीत बी. सुमित रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांनाही पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या आठव्या मानांकित युकी कानेको व मिसाकी मात्सुमोटो यांनी त्यांना 21-17, 21-17 असे केवळ 34 मिनिटात हरविले. पुरुष एकेरीत बे.साई प्रणीत व सौरभ वर्मा यांचे आव्हानही संपुष्टात आले. प्रणीत थायलंडच्या कांताफोन वांगचॅरोनकडून 12-21, 13-21 तर सौरभ फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हकडून 20-22, 12-21 असा पराभूत झाला.