आप नेते व्हेन्झी व्हिएगश यांचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
व्यापारी समुदायासाठी आम आदमी पार्टीच्या ’बिझनेस ब्लास्टर’ धोरणावर प्रभावित होऊन बाणावलीतील प्रमुख व्यावसायिकांनी शुक्रवारी आप नेते वेंझी व्हिएगश यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच बाणावलीतील सर्व मतदारांनी आपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
या भागात व्यवसाय चालविण्यासाठी सरकारकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी बाणवलीतील जनतेने ’आप’ला साथ द्यावी, असे लेव्हिटन परेरा यांनी सांगितले.
15 वर्षांपासून व्यवसायात असतानाही व्यवसाय चालवण्यासाठी आम्हाला राजकीयदृष्टय़ा त्रास दिला जात आहे. आज 95 टक्के व्यापारी बिगर गोमंतकीय आहेत आणि बाणावलीत स्थानिकांचा छळ करण्यात येत आहे. अशावेळी व्हिएगश यांचा बाणावलीसाठीचा दृष्टीकोन प्रभावित करणारा आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र येऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला ाहे, उद्योजक ज्यो परेरा म्हणाले.
केजरीवाल सरकारच्या ’बिझनेस ब्लास्टर’ उपक्रमाची भारतभर मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत आहे. दुसरीकडे गोव्यातील शिक्षण व्यवस्था अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही, असे परेरा यांनी पुढे सांगितले.
सध्या, मतदारसंघातील ज्येष्ट नागरिक दुर्लक्षित आहेत. त्यांच्या कल्याणाची खात्री करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. तथापि, व्हिएगश यांचा ज्येष्ट नागरिकांसाठीचा जाहीरनामा ज्येष्ठाशी संबंधित विविध समस्या आणि चिंता दूर करेल, असा विश्वास व्यापारी मेल्विन परेरा यांनी व्यक्त केला.
बाणावलीला आदर्श मतदारसंघ बनवणार : व्हिएगश
त्यावेळी बोलताना व्हिएगश यांनी, किनारी भागातील सर्व व्यावसायिक नेत्यांनी एकत्र येऊन व्यापारी समुदायासाठी जाहीरनामा तयार करण्याचे आवाहन केले. बाणावलीला आदर्श मतदारसंघ बनवूया. जाहीरनामा तयार करताना लोकांना त्यात सहभागी करून घ्यायचे आहे. या प्रकारची शासनप्रणाली आम्ही आणू इच्छितो, असे व्हिएगश म्हणाले.