स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत मोफत प्रशिक्षण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेती व्यवसायाला शेळीपालन हा पुरक व्यवसाय असल्याने पशुपालकांना चांगली आर्थिक उभारी मिळू शकते. मात्र हा व्यवसाय करण्यासाठी फारसे कोणी धजावत नाहीत. पण बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे राबवण्यात आलेल्या मोफत प्रशिक्षणासाठी जिह्यातील 16 तरूणांनी पुढाकार घेतला आहे.
शेळीपालन हा शेतीपुरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत तो करता येतो. शेळय़ांना इतर जनावरांपेक्षा खूप कमी खाद्य लागते. एका गाईला लागणाऱया खाद्यामध्ये सुमारे 10 शेळय़ा जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे, शेळय़ांच्या आरोग्याचे, निवाऱयाचे व पाण्याचे योग्य नियोजन केल्यास बंदिस्त किंवा अर्ध बंदिस्त व्यवसाय फायदेशीर ठरतो. रत्नागिरी येथे शेळीपालन व्यवसायाला चांगली संधी आहे. त्यासाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत 10दिवसांचे शेळीपालन प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात शेळीपालन या विषयावर डॉ. आनंद लळीत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी क्षेत्रभेटीही घेण्यात आल्या. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षक प्रसाद कांबळे व प्रसाद शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.
व्यवसायाला उभारी मिळण्यास मोलाची मदत
शेळ्यांना देण्यात येणारे खाद्य व त्याचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्था, संगोपन करताना घ्यावयाची काळजी इ.विषयी योग्य माहिती व नियोजन यामुळे व्यवसायाला उभारी मिळण्यास मोलाची मदत पशुपालकांना होऊ शकते.