प्रतिनिधी/ बेळगाव
सायबर क्राईमचे प्रकार वाढतच आहेत. या संबंधी सातत्याने जनजागृती करुनही गुन्हेगारांनी फसवणूक करण्याचा सपाटा मात्र सुरुच ठेवला आहे आणि सावज सहजपणे फशी पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
महिन्याभरापूर्वी हनुमाननगर परिसरातील एका वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी 5 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. किमती भेटवस्तू देण्याच्या आमिषाने वृद्धाला गंडविण्यात आले आहे.
फेसबुकवर परिचय झालेल्या आईस लिओ नामक तरुणीने किमती भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून हनुमाननगर येथील विजयकुमार या वृद्धाला गंडविले आहे. डिलेवरी चार्जिस, टॅक्स व इतर बाबींसाठी टप्प्याटप्प्याने पाच लाख रुपये भरुन घेण्यात आले आहे. त्यानंतर भेटवस्तूही नाही आणि आपण भरलेले पाच लाख रुपयेही नाही. त्यामुळे आपण फसलो गेलो हे लक्षात येताच संबंधित वृद्धाने सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.