आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
आम्ही दिवसरात्र कोरोना काळात काम केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार काम करत आहे. मात्र आम्हाला देण्यात येणारे वेतन तुटपुंजे आहे. तेव्हा आम्हाला किमान 12 हजार रुपये वेतन द्या, अशी मागणी आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 10 जुलैपासून आशा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. ते आंदोलन कोरोनामुळे मागे घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
आम्हाला मास्क देण्यात आले नाहीत. तसेच सॅनिटायझरही देण्यात आले नाही. तरी देखील आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कोविड-19 बाबत जनजागृती केली व यापुढेही करणार आहे. मात्र आम्हाला योग्य वेतन द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 10 जुलैपासून आम्ही सेवा थांबविली होती. मात्र आश्वासन दिल्यामुळे आम्ही काम करत असून तातडीने वेतन द्यावे आणि इतर सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.