वैद्यकीय उपकरणांची कमतरता असताना देखील सर्वाधिक शस्त्रक्रिया
वार्ताहर / हुबळी
ऑपरेशनसाठी आवश्यक उपकरणे आणि औषधांची कमतरता असताना देखील हुबळीतील किम्स हॉस्पिटलच्या कान, नाक आणि घसा (इएनटी) तज्ञांनी ब्लॅक फंगसच्या 97 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सोमवारी आणखी चार ते पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया सुरू होती. राज्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये इतक्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्याचा हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
राज्यात आतापर्यंत ब्लॅक फंगसची (म्युकर मायकोसिस) बाधा होणाऱया रुग्णांची संख्या अत्यल्प होती. त्यानुसार हुबळीच्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपकरणांची व्यवस्था आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान संसर्गमुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला आहे. अशा रुग्णांना ऍम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. फंगस वाढलेला भाग काढून टाकल्यास रुग्ण बरा होवू शकतो. त्यासाठी मायक्रो डिब्रॉयडर उपकरण स्वतः उपलब्ध करून डॉक्टरांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. गंभीर असणाऱया रुग्णांवर दररोज पाच ते सहा या संख्यने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने औषधांचाही पुरवठा होऊन लागल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारपर्यंत 97 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती किम्सचे संचालक डॉ. रामलिंगप्पा अंटरतानी यांनी दिली आहे. राज्य सरकारने हुबळीच्या किम्ससह राज्यात सहा प्रादेशिक केंद्रांची घोषणा करून ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली होती. धारवाडसह शेजारील सात-आठ जिल्हय़ांमधील रुग्णांना किम्समध्ये दाखल करण्यात आले. मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल झाल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱयांवरील ताण वाढला. अशा परिस्थितीतही डॉक्टरांनी ब्लॅक फंगसच्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. राज्य सरकारकडून या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी उपकरणे अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.