दक्षिण कोरियाच्या अधिकाऱयाचा दावा : किम गंभीर आजारी
वृत्तसंस्था / सोल
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन कोमात असून देशाची सूत्रे सध्या त्याची बहिण किम यो जोंग सांभाळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी हा दावा केला आहे. मिन हे दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम देई जुंग यांचे विशेष सहाय्यक राहिले आहेत.
किम जोंग उन गंभीर आजारी असल्याचे मिन यांनी सांगितले आहे. एक महिन्यापूर्वी किम गंभीर आजारी असल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु तेव्हा त्यांनी अचानक समोर येत या कयासांना पूर्णविराम दिला होता.
सद्यकाळात किम जोंग उन कोमात असल्याची माहिती मला मिळाली आहे. परंतु आतापर्यंत तो जिवंत आहे. उत्तर कोरियाची सत्ता किम यांची कनिष्ठ बहिण किम यो जोंग सांभाळत आहे. किमने अद्याप स्वतःच्या बहिणीला सत्ता पूर्णपणे सोपविलेली नाही. नेतृत्वाचे संकट दीर्घकाळ चालू नये आणि सरकार चालविण्याचा अनुभव मिळावा याकरता जोंग यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचा दावा मिन यांनी केला आहे.
दक्षिण कोरियाची नजर
शेजारी देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर दक्षिण कोरियाची करडी नजर आहे. किम कोमात असल्याचे वृत्त समोर येताच दक्षिण कोरियात नॅशनल इंटेलिजेन्स सर्व्हिसची बैठक पार पडली आहे. जोंग यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्याचे वृत्त धक्कादायक नाही. आगामी काळात हेच घडणार आहे. उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्षत्व जोंग यांच्याकडेच होते. एप्रिल महिन्यात उन यांच्यावर हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली असून तेव्हापासूनच ते गंभीर आजारी असल्याचे योनहाप या दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
एकाच शाळेत शिक्षण किम योग जोंग यांना हुकुमशहा किम जोंग उन यांचा सर्वात विश्वासू सहकारी तसेच सरकारमधील शक्तिशाली सदस्य मानले जाते. 1985 मध्ये जन्मलेल्या किम यो-जोंग आणि उन या दोघांनीही स्वीत्झर्लंडच्या बर्नमध्ये शिक्षण घेतले आहे. जोंग यांनी मार्च महिन्यात पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले होते. दक्षिण कोरियाच्या विरोधात त्यांनी आक्रमक भाषा वापरली होती.