उत्तर कोरियाचा हुकुमशहा : हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली
@ प्योंगयांग/ वृत्तसंस्था
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन (36 वर्षे) यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या अधिकाऱयांनुसार एका शस्त्रक्रियेनंतर किम यांची प्रकृती बिघडली आहे. 15 एप्रिल रोजी स्वतःचे आजोबा किम द्वितीय सुंग यांच्याशी संबंधित एका कार्यक्रमात किम यांनी भाग घेतला नव्हता. याच घटनेनंतर हुकुमशहाच्या प्रकृतीसंबंधी कयास व्यक्त केले जात आहेत.
किम यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली नसल्याने प्रकृती अधिकच बिघडल्याचा दावा केला जात आहे. परंतु सद्यकाळात कुठल्याही प्रकारची पुष्टी मिळणे अवघड ठरले आहे. किम जोंग यांच्या पश्चात सत्तास्थानी त्यांची बहिण किम यो जोंग येण्याची दाट शक्यता आहे.
12 एप्रिल रोजी किम यांच्यावर कार्डियोवेस्कुलर शस्त्रक्रिया झाली होती. किम यांना अत्याधिक धूमपानाचे व्यसन आहे. तसेच त्यांना स्थुलत्वाची समस्या आहे. हायंगसन काउंटी येथील व्हिलामध्ये त्यांच्यावर उपचार झाल्याची माहिती दक्षिण कोरियतील एनके या वृत्तपत्राने दिली आहे.
शस्त्रक्रियेनंतर किम यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. तसेच त्यांच्यावर उपचार करणारे बहुतांश डॉक्टर 19 एप्रिल रोजी राजधानी प्योंगयांग येथे परतले होते. तर काही वैद्यकीय कर्मचारी किम यांच्या देखभालीसाठी तेथेच थांबले होते असे एनके या वृत्तपत्राने म्हटले आहे.
किम यांच्या प्रकृतीसंबंधी अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल आणि नॅशनल इंटेलिजेन्सच्या संचालकाकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तर किम जोंग उन यांच्यासंबंधी कुठलेच वृत्त देण्यास उत्तर कोरियाने नकार दिला आहे. उत्तर कोरियात प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नाही. प्रसारमाध्यमांवर पूर्णपणे किम यांचे नियंत्रण असल्याने त्यांच्याशी संबंधित कुठलेच वृत्त सहजपणे जगासमोर येणार नाही.
अफवा असल्याची शक्यता
किम यांच्या प्रकृतीसंबंधी अनेक प्रकारच्या अफवा सध्या सुरू आहेत. ध्रूमपान, हृदयविकार आणि मेंदूशी संबंधित आजाराबद्दल लोक बोलत आहेत. परंतु किम जर रुग्णालयात दाखल नसल्यास त्यांनी 15 एप्रिल रोजी किम द्वितीय सुंग यांच्या कार्यक्रमात का भाग घेतला नाही हे सांगावे लागणर आहे. मागील काही वर्षांमध्ये किम यांच्या प्रकृतीसंबंधी अनेक अफवा पसरल्या असल्याने वस्तुस्थिती समजण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सीआयएचे उत्तर कोरिया विषयक विभागाचे माजी उपप्रमुख ब्रूस क्लाइंगनर यांनी म्हटले आहे.