नवी दिल्ली / वृत्तसंस्था
किरकोळ महागाई दरात जानेवारी महिन्यात वाढ दिसून आली आहे. ही वाढ 6.1 टक्के इतकी असून ती रिझर्व्ह बँकेच्या अधिकतर अनुमानापेक्षा जास्त आहे. काही अन्नपदार्थांच्या वाढत्या दरांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसत आहे, अशी माहिती सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
डिसेंबरमध्ये महागाई निर्देशांकात 5.6 टक्यांची वाढ झाली होती. ती जानेवारीत त्याच्याही पेक्षा जास्त पातळीवर पोहचली. जानेवारी 2021 मध्ये किरकोळ महागाई दर 4.05 इतका होता. महागाई दर 4 टक्क्यांच्या आसपास राहणे हे आदर्श मानले जाते. तथापि, यावेळी ही मर्यादा पार झाली असल्याने सरकारला काही उपाययोजना करावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अन्नधान्ये महाग
डाळ, धान्य आणि आणि अंडी तसेच मासे यांच्या महागाई दरातील वाढ कमी आहे. कांदे आणि बटाटे यांच्या महागाईचा दर 14 ते 16 टक्के आहे. खनीज तेल आणि पेट्रोलियम तसेच नैसर्गिक वायू यांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने 2022 मध्ये महागाई दरात वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंच्या दरात 9.42 टक्के वाढ झालेली दिसून येते. ती गेल्या महिन्यात 10.62 टक्के होती. वीजेच्या दरात जानेवारीत राष्ट्रीय सरासरीनुसार 32.27 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वीजेच्या महागाईचा दर डिसेंबरात कमी होता.
रिझर्व्ह बँकेनेही गेल्या आठवडय़ात वित्तस्थिती स्पष्ट करताना महागाईवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसेच आगामी काळात जागतिक परिस्थितीमुळे महागाई वाढणार असल्याचा इशाराही दिला होता. मात्र, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात बदल करण्याचे टाळले होते. आता सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँकेचा इशारा खरा ठरताना दिसत आहे.
सोने महागले, रुपया घसरला
सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पहावयास मिळाली आहे. शेअर बाजारांमधली गुंतवणूक कमी करुन अनेकजण सोने आणि चांदीत गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे या दोन मौल्यवान धातूंची मागणी वाढली असून परिणामी दरही वाढले आहेत. सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति दहा ग्रॅम 819 रुपयांची वाढ होऊन दर 49,739 रुपयांपर्यंत पोहचले. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 1,712 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चांदीचा दर आता दिल्लीत 64,103 झाला आहे.