तृणमूल कॉग्रेसमध्ये प्रवेश – हळदोणा, थिवी मतदारसंघातून उमदेवार निवडून आणणारच
प्रतिनिधी/ म्हापसा
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव झालाच पाहिजे. यासाठी आपण गोवा फॉरवर्डचा राजीनामा दिल्याचे किरण कांदोळकर यांनी पत्रकारांसमोर बोलताना स्पष्ट केले.
आपण गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला त्याचवेळी आपण पक्ष प्रमुख विजय सरदेसाई यांच्याकडे हळदोणा व थिवी आम्ही निवडणूक लढविण्याची अट घातली होती. त्यावर त्यांनी काँग्रेससोबत बोलणी चालू आहे. हळदोणावर काँग्रेसचा डोळा आहे. हळदोणा मतदारसंघात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम प्रचारासाठी फिरत आहे. त्यामुळे आपल्यास हळदोणावासियांनी पक्ष सोडून अपक्ष निवडणूक लढवा, असे सूचित केले. 2012 व 2017 असे दोनवेळा काँग्रेसने सरदेसाईंची फसणूक केली. काँग्रेस भाजपला हटविण्यासाठी अद्याप गंभीर नाही. अद्याप युतीबाबत काही बोलत नाही. 2022 भाजपला घरी पाठविण्यास आपण गंभीर आहे. यामुळे आपण वैयक्तिक गोवा फॉरवर्डचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या काणका निवासस्थानी बोलताना सांगितले.
काँग्रेस पक्ष उमेदवारीबाबत निर्णय घेताना प्रत्येकवेळी वेळकाढू धोरण अवलंबितो आणि ऐनवेळी उमेदवाराचे नाव जाहीर करतात. यामुळे प्रचाराला वेळच मिळत नाही. असा प्रकार प्रत्येकवेळी घडतो. यासाठी निर्णय मला घ्यावा लागला, असे कांदोळकर म्हणाले.
विजय सरदेसाई यांचा हा घात नाही का असा प्रश्न कांदोळकर यांना केला असता, राजकारणात विश्वासघात हा शब्द नसतो. वर्षभरात आपल्यास चांगला अनुभव आला आहे. विजय सरदेसाईंबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. काँग्रेस परत एकदा त्यांची फसवणूक करणार. यापूर्वी दोनवेळा केली. आज विरोधक म्हणून विजयच आवाज उठवतात. काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे. काँग्रेस भाजपची बी टीम झालेली आहे, असा आरोपही कांदोळकर यांनी यावेळी केला
थिवी, हळदोणाचे उमेदवार निवडून आणणार!
हळदोणा माझी जन्मभूमी आहे. सर्व हळदोणावासीयांनी मला बोलावून आम्ही तुम्हाला निवडून देऊ, अशी हमी देत आहेत. कॉग्रेस-गोवा फॉरवर्ड यांची शेवटच्या क्षणी युती झाल्यास नाही उपयोग नाही. हळदोणा व थिवी मतदारसंघातून दोन्ही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण हळदोणा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. हळदोणा आपली जन्मभूमी आहे. थिवीवासियांनी आपले राजकीय जीवन घडविले, असे कांदोळकर म्हणाले. दरम्यान, सायंकाळी किरण कांदोळकर यांनी पणजीत जाऊन तृणमूल पक्षात प्रवेश केला.