वृत्तसंस्था/ कटक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ओडिशा खुल्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत किरण जॉर्जने तृतीय मानांकित शुभंकर डेचा धक्कादायक पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीत मालविका बनसोडने आपली विजयी घोडदौड कायम राखत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.
शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बिगर मानांकित किरण जॉर्जने तृतीय मानांकित शुभंकर डेचा 21-16, 10-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. आता अन्सल यादव आणि एम. तरुण यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर किरण जॉर्जचा उपांत्य फेरीत सामना होईल.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मालविका बनसोडने तानिया हिरेमठचा 58 मिनिटांच्या कालावधीत 21-13, 16-21, 21-17 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडने महिला एकेरीत उपविजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत मालविकाने सायना नेहवालला पराभवाचा धक्का दिला होता. पण अंतिम लढतीत तिला टॉप सीडेड पी. व्ही. सिंधूकडून हार पत्करावी लागली होती. ओडिशा बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित अस्मिता चलीहाने ऋचा सावंतचा 21-17, 21-15, तसेच स्मित तोशिनवालने अमेरिकेच्या इशिका जैस्वालचा 8-21, 21-9, 21-14 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे.
पुरुष विभागात बिगर मानांकित मिथुन मंजुनाथने सातव्या मानांकित मलेशियाच्या चेमचा 13-21, 21-14, 21-8 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या एम. आर. अर्जुन-त्रिशा जॉली, बी. यादव-स्वेतपर्णा पंडय़ा, मयुरन आणि बालाशेरी या तीन जोडय़ांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे.