गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार : गोव्याच्या संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न : किरण ठाकुर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
उद्योगाबरोबरच समाजकार्य करून पुढील पिढय़ांना राष्ट्रपेमाचे संस्कार किरण ठाकुर यांनी दिले आहेत. तरुण भारतमधून परिवर्तन करताना लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी हजारो हातांना काम दिले. त्यांच्या सामाजिक कार्याला गोवा सरकारचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य को-ऑप. सोसायटीतर्फे हिंडलगा येथील गणाधीश लॉन येथे गुरुवारी आयोजित कृतज्ञता सोहळय़ात डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
व्यासपीठावर तरुण भारतच्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर, स्वागत समितीचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सदस्य उद्योजक दिलीप चिटणीस, विनायक आजगावकर, लोकमान्यचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक डॉ. डी. पी. वागळे, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सेवंतीलाल शहा, प्रभाकर पाटकर, गायत्री काकतकर, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. प्रमोद सावंत यांनी किरण ठाकुर यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
प्रमोद सावंत म्हणाले, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना गोव्यातील पाळी-कोठंबी या दुर्गम गावात एकांकिका महोत्सवासाठी किरण ठाकुर आले आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. बेळगावबरोबरच गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात किरण ठाकुर यांचे कार्य मोठे आहे. भक्तीमहोत्सव, शिमगोत्सव यातून गोव्याच्या संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वृत्तपत्रात नेहमीच परखड भूमिका मांडत ज्यावेळी राजकारणात चुका होतात, त्या त्यांनी कोणतीही तमा न बाळगता मांडल्या. गोवा व बेळगावचे नाते नेहमीच सलोख्याचे व आपुलकीचे राहिले आहे, आणि पुढेही तसेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना किरण ठाकुर म्हणाले, बेळगाव आणि गोव्याचे नाते सख्ख्या भावंडांचे आहे. तरुण भारत व लोकमान्य सोसायटीला गोवेकरांनी भरभरून प्रेम दिले आहे. लोकमान्य सोसायटीने सामाजिक जबाबदारीतून कोरोनाकाळात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केंद्र सरकारला 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तर 10 लाखाचे किट पुण्याला पाठवून देण्यात आले. लोकमान्यवर विश्वास ठेवत तब्बल दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी लोकमान्य सोसायटीमध्ये ठेवून गोमंतकीय जनतेने लोकमान्यचे हात बळकट केले, याचा किरण ठाकुर यांनी आवर्जून उल्लेख केला.
गोव्यात उभारणार फूडपार्क
बेळगावहून गोव्याला दररोज 150 ते 200 ट्रक भाजीपाला व इतर साहित्य जाते. बेळगावची भाजी बेळगावच्याच दरात गोव्यात उपलब्ध होईल, तसेच बेळगावच्या भाजीला चांगला दर मिळेल, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. गोव्यात फूडपार्क उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामुळे शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहे. गोव्याच्या पर्यटनाचा बेळगावलाही फायदा होतो. आशियातील पहिला ‘रोप टेन’ उपक्रम चोर्ला येथे राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल लोकमान्य व तरुण भारत परिवारातर्फे डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना अविनाश पोतदार म्हणाले, सात या अंकाला विशेष महत्त्व आहे. सूर सात आहेत, इंद्रधनुष्याचे रंगही सात आहेत, नक्षत्रेही सात आहेत, त्यामुळे किरण ठाकुर यांच्या जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. वटवृक्ष वाढण्यास वेळ लागतो, परंतु तो चिरंतन टिकतो. किरण ठाकुर म्हणजे असाच वटवृक्ष असून त्यांच्या सहवासात राहणे हे आनंददायी असते. आपल्या मार्कंडेय साखर कारखान्यासाठी लोकमान्यने मोलाची मदत केल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला.
लोकमान्य सोसायटीच्या नव्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. अनिल चौधरी यांनी केले. समन्वयक विनायक जाधव यांनी आभार मानले. किरण ठाकुर यांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव, कोल्हापूर, गोवा येथील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विशेष…
- बेळगाव आणि गोव्याचे नाते सख्ख्या भावंडांचे
- गोव्याच्या पर्यटनाचा बेळगावलाही फायदा
- किरण ठाकुर यांच्या जन्मतारखेला विशेष महत्त्व
योगायोग…
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वच्छ चारित्र्याचे क्यक्तिमत्त्व होते. ते दुसऱयांदा मुख्यमंत्री असताना माझ्या 60 व्या वाढदिवसाला आले होते. योगायोगाने आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दुसऱयांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 70 व्या वाढदिवसाला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाकाळात केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार किरण ठाकुर यांनी काढले.