प्रतिनिधी/ बेळगाव
चैनीसाठी किराणा दुकानदाराचे अपहरण करून त्याचा पाच जणांनी खून केला होता. या प्रकरणातील चार जणांना यापूर्वी जामीन मिळाला होता. एका संशयिताला जामीन मिळाला नव्हता. मात्र, गोकाक येथील बारावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मनोज मल्लाप्पा वालीकर (वय 30, रा. सिद्धेश्वरनगर, गोकाक) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मनोजसह पाच जणांनी किराणा दुकानदार जगदीश तिप्पाण्णा कराळे (वय 35) याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला रिक्षातून घेऊन जाऊन सिंगलापूर गावाजवळील घटप्रभा ब्रिजजवळ त्याच्यावर चाकूने वार केला. आम्हाला पैसे दे म्हणून त्याच्याकडे मागणी केली. मात्र, जगदीशने पैसे देण्यास विरोध केल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
या घटनेत किराणा दुकानदार जगदीश याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. गोकाक न्यायालयाने संशयित मनोजला विविध अटींवर जामीन मंजूर केला आहे. मनोज याच्यावतीने ऍड. व्ही. के. कळ्ळीमनी यांनी काम पाहिले.