ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केलेत असा आरोप संजय राऊतांनी केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत अशा शब्दांत टीका केली.
किरीट सोमय्यांनी फडणवीसांच्या नावाने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवलं, प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत व त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबाचे अलिबागमधील 19 बंगले दाखविण्याचे आव्हान किरीट सोमय्या यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोपांसंबंधी बोलताना ते सिद्ध करा, अन्यथा जोड्य़ाने मारेन असेही राऊत यांनी म्हटले होते. त्याला किरीट सोमय्यांनी बुधवारी उत्तर दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील खुन्नस काढायची आहे, म्हणून राऊत माझा वापर करत आहेत. जोड्य़ाने मारण्याची भाषा ते रश्मी ठाकरेंना संबोधून बोलत आहेत. किरीट सोमय्यांना जोडय़ाने मारणार असाल तर मारा, माझ्याच जोडय़ाने मारा. मी तयार आहे! मी माझी चप्पल संजय राऊत यांच्या हातात द्यायला तयार आहे. फक्त राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं, असेही सोमय्या म्हणाले. यांनतर आज पुन्हा संजय राऊत यांनी सोमय्यांनी शाह आणि फडणवीसांच्या नावाने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप केला आहे.