अखेर कराडातील राजकीय हायहोल्टेज ड्रामा समाप्त
कराड / प्रतिनिधी :
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत कोल्हापूरला निघालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर व सातारा पोलिसांनी कराड रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. कराडच्या शासकीय वि्श्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे- पवार यांच्यासह मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल करत किरीट सोमय्या सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईकडे रवाना झाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सोमय्या यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यावर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. सोमय्या जोपर्यंत कराडच्या शासकीय विश्रामगृहावर होते तोपर्यंत शासकीय विश्रामगृहाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. विश्रामगृहाच्या रस्त्यांवर बॅरिगेटस लावून रस्ते बंद करण्यात आले होते. सोमय्या यांनी कराडच्या स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्याशी काहीवेळ संवाद साधला.