बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची घोषणा
वार्ताहर / दाभाळ
किर्लपाल दभाळ पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या येत्या 25 डिसेंबर पर्यंत सोडविण्याची ग्वाही बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. किर्लपाल येथे पायवाटेवर पेव्हर्स बसविण्याच्या कामाला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, उपसरपंच शशिकांत गांवकर, पंचसदस्य रमाकांत गांवकर, तुळशीदास गांवकर, कल्पेश गांवकर, माजी सरपंच कालिदास गांवकर, बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते प्रदीप पेडणेकर, कनिष्ठ अभियंते उशांत कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
किर्लपाल गावात पावसाळय़ात पायवाटांवर ठिकठिकाणी पाणी साचून राहत होते. तसेच चिखलातून मार्ग काढीत घरांकडे जावे लागत होते. रात्रीच्यावेळी तर अंधारात जास्तच गैरसोय व्हायची. या समस्या कायम निकाली काढण्यासाठी गावातील सर्व पायवाटावर पेव्हर्स बसविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार मंत्री पाऊसकर यांनी बांधकाम खात्यांतर्गत अंदाजे रु. 85 लाख खर्चून पेव्हर्स बसविण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सावर्डे मतदारसंघातील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून जाणवणाऱया विविध समस्या सोडविण्याचे आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. येणाऱया काळात अनेक कामे मार्गी लागणार असून नागरिकांनी विकासकामांत सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री पाऊसकर यांनी केले. सुवर्णा तेंडुलकर यांचेही भाषण झाले. स्वागत शशिकांत गांवकर यांनी तर रमाकांत गांवकर यांनी आभार मानले.