प्रतिनिधी/ बेळगाव
सम्राट अशोक चौक कॉर्नरपासून मुख्य महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एका बाजूचे काँक्रिटीकरण झाले असून दुसऱया बाजूचे काम करण्यात येणार आहे. यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. किल्ला तलावापासून कणबर्गी रोडपर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.
शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे राबविली जात आहेत. रस्ते, गटारी तसेच इतर ठिकाणी विकासकामे होत असल्यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. क्राँक्रीटचे रस्ते असल्यामुळे ते पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडत आहे. किल्ला येथील सम्राट अशोक चौक येथे वर्दळ जास्त असल्यामुळे सकाळपासून कोंडी होताना दिसत आहे.
वाहनचालकांना घालावा लागतोय वळसा
सम्राट अशोक चौकमार्गे महामार्गाकडे जाणाऱया वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत आहे. त्यांना किल्ला तलावमार्गे कणबर्गी रोडवरून महामार्गावर जावे लागत आहे. संकम हॉटेलमार्गे जाणारी वाहतूक कणबर्गी रोडमार्गे वळविण्यात आल्याने शनिवारी मोठय़ा प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.