दोन दिवस गड संवर्धन कार्य
लाठी-काठी प्रात्यक्षिकांचा थरार
प्रतिनिधी / सातारा
किल्ले अजिंक्यतारा येथे दुर्ग सेवक व शिवभक्तांनी गेल्या दोन दिवसांमध्ये गडावर दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम साजरा केला. शिवकन्या सहभागी झाल्या होत्या. लाठ्याकाठ्याचा खेळ सादर करण्यात आला. पुणे, मुंबई येथील शिवभक्त यावेळी उपस्थित होते.
किल्ले अंजिक्यताऱ्याला राजा भोजपासून छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंत इतिहास आहे. मराठ्यांची राजधानी आहे. अटकेपार झेंडे याच किल्ल्यावरील राजसदरे वरून दिलेल्या आदेशानुसार लावण्यात आले होते. त्याच किल्ल्यावर गडकोट संवर्धनासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. यातील काही संघटना व शिवभक्त यांनी गेले दोन दिवस सायंकाळी गडाच्या महाद्वाराच्या परिसरात दीप पेटवून वातावरण उल्हसित करून टाकले होते. रात्रीच्या वातावरणात गडाच्या परिसरात लाठीकाठी व प्रात्यक्षिकाचा थरार पहायला मिळाला. सातारा येथील जे जे कार्यकर्ते गडासाठी काम करतात त्यांचा यावेळी संजीवी फाऊंडेशन संस्थापिका अध्यक्षा विशाखाताई गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये अभि सुर्वे, प्रियांका तोरस्कर यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.