नोव्हेंबरमधील नोंद : गतवर्षीच्या तुलनेत पर्यटक संख्येत घट : होडीसेवेला परवानगीमुळे समाधान
संग्राम कासले / मालवण :
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हय़ात पर्यटक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत. जिल्हाधिकारी यांनी नोव्हेंबरमध्ये सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेता येऊ लागले आहे. नोव्हेंबर महिन्यात येथील किल्ले सिंधुदुर्गला 21,273 पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे. कोरोनामुळे 2019 हे वर्ष पर्यटनाच्यादृष्टीने निराशानजक गेले होते. परंतु नोव्हेंबरमध्ये पर्यटक मोठय़ा संख्येने येत असल्याने आगामी पर्यटन हंगामाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल.
ऑक्टोबर महिन्यापासून सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओघ सुरू झाला होता. परंतु ऑक्टोबरमध्ये शासनाकडून होडीसेवेला परवानगी न मिळाल्याने अनेक पर्यटकांना होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे जाऊन किल्ल्याचे दर्शन घेता आले नव्हते. परंतु 8 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी यांनी किल्ला होडी वाहतूकीला परवानगी दिली. त्यामुळे तब्बल 235 दिवसांनी किल्ला प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे नोव्हेंबरपासून जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेता आले.
दरवर्षी सप्टेंबर ते मेपर्यंत पर्यटक लाखोंच्या संख्येने किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटनाच्यादृष्टीने 2020 हे वर्ष निराशाजनक गेले. नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकारी यांनी किल्ला होडी प्रवासी वाहतूकीला परवानगी दिल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, पर्यटन व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये किल्ले सिंधुदुर्गला 26,980 पर्यटकांनी भेट दिली होती. परंतु, नोव्हेंबर 2020 मध्ये 21,273 पर्यटकांनी भेट दिली आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये पर्यटक संख्येचा विचार करता, यावर्षी नोव्हेंबरमध्ये 5 हजारने पर्यटक संख्येत घट झाली आहे.
अटी, शर्थीचे पालक करून किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन
पर्यटकांना अटी, शर्थीचे पालन करून होडीतून किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन दिले जात आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेतर्फे पर्यटकांनी घ्यायच्या काळजीचे माहितीपत्रक तिकिट फलकाशेजारी लावण्यात आले आहे. तिकिट बारीच्या शेजारी पर्यटकांना सॅनिटायझर ठेवण्यात आले असून सामाजिक अंतरही योग्य पद्धतीने राखण्यात येत आहे.
किल्ले सिंधुदुर्गच्या बुरुजांवरील झाडी वाढली
किल्ले सिंधुदुर्गच्या बुरुजांवरील झाडी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. परंतु पुरातत्व विभागाने ही झाडी तोडण्याबाबत अद्यापही कार्यवाही केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन हंगाम उशिराने सुरू झाला आहे. परंतु किल्ले सिंधुदुर्गवर आता पर्यटक मोठय़ा संख्येने येत आहेत. वाढलेल्या झाडींबद्दल पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.