छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास बालमनावर रुजविण्याचा किल्ला स्पर्धा आयोजनाचा उद्देश
युवराज पाटील /सांबरा
तालुक्यात बालचमू व शिवप्रेमी युवकांनी आकर्षक किल्ले बनविले आहेत. यामध्ये खासकरून बालचमूंची संख्या जास्त असून किल्ल्यांमुळे सर्वत्र शिवसृष्टीच अवतरल्याचा भास होत आहे.
दरवर्षी दिवाळीची लगबग सुरू झाली की, बालचमूंकडून किल्ले बनविण्यास प्रारंभ केला जातो. दिवाळीनंतरही अनेकांची किल्ले पाहण्यासाठी गर्दी होत असते. अनेक गावांमध्ये भव्य किल्ला स्पर्धा भरवून मुलांना प्रोत्साहन दिले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास व त्यांची कीर्ती बालमनावर रुजावी हा या मागचा उद्देश असतो.
लहान मुले एकत्र येऊन किल्ले बनविण्यास प्रारंभ करतात. त्यामुळे त्यांच्यात एकीची भावना रुजू होते, धर्माप्रती आवड निर्माण होते. दरवर्षी त्यांच्याकडून वेगवेगळे किल्ले बनविले जातात. यामुळे मुलांना किल्ल्यांची माहिती समजून घेण्यास मदत होत आहे. किल्ल्यांमुळे भावी पिढीत जागृती निर्माण करण्याचे कामही घडत आहे. त्यामुळे दिवाळी आली की मुलांच्या उत्साहाला उधाण येते.
कणबर्गी येथे दरवर्षी अनेक आकर्षक किल्ले बनविले जातात. यंदाही चाळीसहून अधिक किल्ले बनविले आहेत. दहा वर्षांच्या आतील मुलांनी हे सर्व किल्ले बनविले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून भव्य किल्ला स्पर्धा भरविली जाते. सध्या येथील किल्ले आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून किल्ले पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
पाटील गल्ली येथे ओमकार सुतार याने आकर्षक सज्जनगड किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे. ज्योतिर्लिंग गल्लीमध्ये ओमकार मुचंडीकर याने लोहगड बनविला आहे. ज्योतिर्लिंग गल्ली सहावा क्रॉस येथे सिद्धार्थ कंग्राळकर याने मल्हारगड बनविला आहे. याच गल्लीतील नवनाथ मोदेकर व चेतन मोदेकर यांनी राजहंसगडाची प्रतिकृती साकारली आहे. रामतीर्थ गल्ली येथे निलेश सुतार व सर्वेश सुतार यांनी सुंदरगड (दाते गड) बनवून किल्ल्याची संपूर्ण माहितीही प्रसिद्ध केली आहे. यासह इतर सर्व किल्लेही बालचमूंनी हुबेहुब बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
बाळेकुंद्री खुर्द येथे साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती
लक्ष्मीनगरमध्ये ओमकार जाधव व सहकाऱयांनी हुबेहूब अशी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. सध्या हा किल्ला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होऊ लागली आहे. ओमकार जाधवसह हरिष हन्नीकेरी, शुभम पाटील, सतीश हन्नीकेरी, शशीधर कमलापगोळ, आकाश बुरुड, रोहित गुळापगोळ, सुनील गुळापगोळ, रमेश गुळापगोळ आदींनी हा किल्ला बनविला आहे. पाटील गल्लीमध्ये शिवशक्ती बाल युवक मंडळाने आकर्षक सिंहगड किल्ला बनविला आहे. अवधूत पाटील, नील पाटील, स्वप्नीन पाटील, समर्थ पाटील व मनोज पाटील यांनी हा किल्ला बनविला आहे. पाटील गल्लीतील रामनरेश पाटील याने आकर्षक रायगड किल्ला बनविला आहे. कार्तिक पाटील, आर्यन पाटील, पूर्वी पाटील व प्रेम पाटील यांनी रामगड बनविला आहे.
बसरीकट्टीत बालचमूंनी साकारला सिंहगड किल्ला
बसरीकट्टीत दहाहून अधिक किल्ले बनविले आहेत. गंजीरप्पा गल्लीमध्ये स्वयं कुरंगी, समर्थ कुरंगी, समर्थ कोंडसकोप व सुशांत मर्वेकर यांनी आकर्षक सिंहगड (कोंढाणा) किल्ला बनविला आहे.