रस्ते खुले असल्याचा कॅन्टोन्मेंट बोर्डचा दावा फोल : प्रवेशद्वार सुरू ठेवण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
किल्ला येथील दुर्गादेवी मंदिर परिसरातील प्रवेशद्वार कोरोनाचे कारण देत बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी किल्ला परिसरातील वाहतूक ठप्प झाली असून किल्ल्यात राहणाऱया नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र फोर्ट रोडकडील प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी ये-जा करणाऱया नागरिकांची चौकशी करून सोडण्यात येत असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद आहे. मात्र कोरोनाचे कारण पुढे करीत लष्करी अधिकाऱयांनी किल्ल्याचे दरवाजे बंद केले आहेत. किल्ला परिसरात राहणाऱया रहिवाशांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील विविध रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशातच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवल्याने अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱया रहिवाशांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. किल्ला परिसरात विविध सरकारी कार्यालये असून अधिकारी, तसेच विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक किल्ला परिसरात रहात असतात. पण प्रवेशद्वार बंद केल्याने अडचणी निर्माण झाल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व रस्ते नागरिकांसाठी खुले असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी बैठकीत दिली होती. पण ही माहिती दिलेल्या चारच दिवसांत किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद केले आहे. त्यामुळे ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या फोर्ट रोडकडील रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. पण याठिकाणी सर्व नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. वास्तविक पाहता सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. केवळ किल्ला परिसरातील नागरिक काही कारणास्तव घराबाहेर पडत असतात. पण त्यांना लष्करी अधिकाऱयांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.