वृत्तसंस्था / टोकियो
जपानचे माजी विदेशमंत्री फूमिओ किशिदा यांनी सत्तारुढ पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली आहे. याचबरोबर त्यांचा पंतप्रधान होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. किशिदा हे पक्षाचे विद्यमान नेते आणि पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची जागा घेणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्याच्या केवळ एक वर्षातच सुगा पद सोडत आहेत. जपान हा भारताचा मित्रदेश असल्याने किशिदा यांची चीनबद्दलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे नवे नेते म्हणून किशिदा यांना संसदेत सोमवारी पुढील पंतप्रधान म्हणून निवडले जाणार हे आता निश्चित आहे. किशिदा यांनी पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत लसीकरण मंत्री तारो कोनो यांच्यावर मात केली आहे. पहिल्या फेरीत त्यांनी दोन महिला उमेदवार सना तकाइची आणि सेइको नोडा यांना पराभूत केले होते. किशिदा यांना स्वतःच्या पक्षाच्या दिग्गजांकडून अधिक समर्थन मिळाले, त्यांनी कोनो यांच्याकडून पुरस्कृत बदलाऐवजी स्थैर्याचे निवड केल्याचे निकालातून दिसून येते.
कोनो यांना स्वतंत्र विचारांचे व्यक्ती म्हणून ओळखले जाते. नव्या नेत्यावर पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा दबाव आहे. सुगा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची प्रतिमा बिघडली आहे. कोरोना महामारी हाताळण्याच्या पद्धती आणि टोकियोत ऑलिम्पिकचे आयोजन करण्यावर ठाम राहिल्याने सुगा यांनी जनतेत आक्रोश निर्माण केले आहे.
किशिदा यांनी स्वतःच्या ‘नव भांडवलवादा’च्या अंतर्गत वृद्धी आणि वितरणचे आवाहन केले आहे. टोकियो विद्यापीठातील राजशास्त्राचे प्राध्यापक यू उचियामा यांच्यानुसार नव्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण कूटनीतिक आणि सुरक्षा धोरणांमध्ये आमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. शिंजो आबे यांनी यापूर्वी प्रकृती अस्वास्थाचा दाखला देत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यावर सुगा केवळ एक वर्षापर्यंत या पदावर राहिले. सुगा देखील आता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
64 वर्षीय फुमियो यांनी एलडीपीचे धोरणप्रमुख म्हणून काम केले आहे. ते उदारमतवादी गटाचे नेतृत्व करतात. या गटात चार माजी पंतप्रधान सामील होते. 2020 च्या पक्षनेतृत्वाच्या शर्यतीत ते योशिहिदे सुगा यांच्याकडून पराभूत झाले होते. फुमियो यांचा जन्म मिनामी-कु हिरोशिमामध्ये एका राजकीय घराण्यात झाला होता. त्यांचे वडिल आणि आजोबा राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान कीची मियाजावा हे किशिदा यांचे नातलग आहेत. किशिदा यांनी 2012-17 या कालावधीत विदेशमंत्री म्हणून काम केले होते.