प्रतिनिधी/ सातारा
अडीच महिने लॉकडाऊन असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठय़ा आर्थिक अडचणीत आले आहे. सध्या फक्त पार्सल सुविधा देण्याची परवानगी दिली असल्यामुळे ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत सातारा येथील किश्त या खाजगी फायनान्स कंपनीचे अधिकारी-कर्मचारी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आता लावत आहेत. हप्ते न भरल्यास दंड करू असे धमकावत आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरू होईपर्यंत हप्त्यासाठी तगादा न लावण्याच्या सूचना आपण संबंधित कंपनीला द्याव्यात, अशी मागणी अमित मोतीराम हुंबरे रा. सुयोग कॉलनी, गेंडामाळ, सातारा यांनी एका तक्रार एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की गेल्या तीन वर्षापासून ठोसेघर, ता. सातारा येथे मी हॉटेल व्यवसाय करीत आहे. हॉटेल व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी 2019 साली सातारा येथील अजंठा चौक परिसरात कार्यरत असणाया किश्त या खाजगी फायनान्स कंपनीकडे मी कर्जाची मागणी केली होती. माझ्या मागणीनुसार 8 मार्च 2019 रोजी कंपनीने मला 3 लाख 66 हजार रुपये एवढे कर्ज मंजूर करून दिले. या कर्जासाठी 24 टक्के एवढा व्याजदर आकारण्यात आला होता.
या कर्जापोटी प्रतिमहिना 5 तारखेला 12 हजार रुपयांचा हप्ता मी फायनान्स कंपनीच्या अकाउंटवर ऑनलाइन जमा करत होतो. सातारा जिह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दि.23 मार्च 2020 पासून संपूर्ण राज्यासह सातारा जिह्यामध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानासह हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एप्रिल 2020 मध्ये भारतीय रिझर्व बँकेने बँकांसह खाजगी फायनान्स कंपन्यांना कर्जाचे हप्ते न घेण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असतानाही किश्त कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातून एप्रिल आणि मे या महिन्यात हप्ते भरण्यासाठी दूरध्वनीवरून सातत्याने तगादा लावला जात होता. त्यामुळे मित्रमंडळींकडून उसने पैसे घेऊन मी एप्रिल महिन्याचा हप्ता भरला होता. तद्नंतर सातत्याने माझ्यावर हप्ते भरण्यासाठी कंपनीकडून दबाव टाकला जात आहे.
सद्य परिस्थितीत हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. अद्यापही ठोसेघर येथील धबधबा पर्यटकांसाठी बंद असल्यामुळे याठिकाणी पर्यटक येत नाहीत. परिणामी प्रशासनाने हॉटेल उघडण्याची मुभा दिली असली तरी पर्यटकच येत नसल्याने आम्हाला हॉटेल पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहे. ही वस्तुस्थिती असताना मे आणि जून या दोन महिन्यांचे हप्ते भरा अन्यथा 2 हजार 535 रुपये दंड आकारला जाईल असे धमकावले जात आहे. गेले अडीच महिने हॉटेल पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडलो आहेत. हॉटेल बंद असल्यामुळे सध्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला असताना किश्त फायनान्स कंपनीतील पुणे येथील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सातत्याने फोन करून हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरू होईपर्यंत हप्त्यासाठी तगादा न लावण्याच्या सूचना आपण संबंधित कंपनीला द्याव्यात.